नाशिक : दिंडोरी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणारा युवक किरण सानप याने शरद पवारांची भेट घेतली. किरण हा पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून २०१९ पासून तो पक्षाचे काम करतो. शेतकरी म्हणून मी पंतप्रधानांच्या सभेला गेलो होतो असे सांगत शरद पवारांनी भाषणात हा माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असे म्हटले होते. त्यासाठी त्यांच्या भेटीसाठी आलो असे किरण सानप याने सांगितले.
पवारांच्या भेटीनंतर किरण सानप म्हणाला की, शरद पवारांनी मला आशीर्वाद दिले, पोलिसांनी काही त्रास दिला का? अशी विचारपूस केली. मला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निफाड तालुका कांद्याची पंढरी आहे. कांदा शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. मी १५ मिनिटे मोदींचे भाषण ऐकले. कांद्यावर ते बोलतील हे मला जाणवले नाही. त्यामुळे पर्यायाने मला कांद्यावर बोला ही घोषणा द्यावी लागली असे त्याने सांगितले. तसेच मी सभेला सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो. मी शरद पवारांच्या नावाने आणि कुठल्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिली नाही.