सातारा : प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे आहे. मतदारसंघातून भाजपला रोखणारा सक्षम उमेदवार असावा, अशी भावना आहे. शेवटी उमेदवार निवडीचा निर्णय त्यांचा आहे. तरीही मतदारसंघ लढविण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडे आल्यास त्यावर विचार करू. पर्याय काढून पक्षाने आदेश दिल्यास माझीही निवडणूक लढण्याची तयारी आहे, परंतु मी शरद पवार गटाच्या चिन्हावर मी निवडणूक लढणार नाही असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सातारा काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कोण असावा, याविषयी चर्चा होत आहेत. याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही माझ्याशी भेट झाली.
मतदारसंघ त्यांच्याकडेच असल्याने शरद पवार यांनीच उमेदवाराबाबत निर्णय घ्यायचा आहे. फक्त भाजपला रोखून ठेवणारा सक्षम उमेदवार असावा, ही भावना आहे. आम्ही शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत.