इंदूर : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सध्या सुरू असलेली कामे जलद गतीने पूर्ण करेल, असा पूर्ण विश्वास असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, कोणाकडे काहीही मागण्यापेक्षा मला मरायला आवडेल. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मला नम्रतेने सांगायचे आहे की मला काहीही मागायचे नाही. त्यामुळेच मी दिल्लीला जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यालयाने या पत्रकार परिषदेपूर्वी एक व्हीडीओ शेअर केला, ज्यामध्ये मध्य प्रदेशचे निवर्तमान मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान काही महिलांना भेटल्यानंतर त्या भावूक झाल्या. व्हीडीओमध्ये ते महिलांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना शांत करताना दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत तीन वेळा आमदार असलेले मोहन यादव यांची मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजप विधीमंडळ पक्षाने यादव यांची विधिमंडळ नेता म्हणून निवड केली, ज्यामुळे त्यांना मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.