28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहणार असतील तर राज्यात गुन्हेगारांचे राज्य येईल 

मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहणार असतील तर राज्यात गुन्हेगारांचे राज्य येईल 

गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

कल्याण : शुक्रवारच्या रात्री हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांनी आपल्या कृत्याची कबुली देखील दिली. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही, असे सांगताना मला मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगार बनवले आहे, जर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहणार असतील तर राज्यात गुन्हेगारांचे राज्य येईल, असे गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केले. यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली.

आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहे. हे प्रकरण शुक्रवारी उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात पोहोचले. या वेळी पोलिस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात झालेल्या या गोळीबारात गायकवाड जखमी झाले असून, त्यांना ज्युपिटर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले तर पक्षनेतृत्वाला अनेकदा सांगूनही त्यांनी यात लक्ष घातले नाही, असे म्हणत फडणवीस यांच्याविषयी नाराजी बोलून दाखवली.

मुख्यमंत्र्यांनी मला गुन्हेगार बनविले : गणपत गायकवाड
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवले आहे. माझे राजकीय जीवन संपविण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असे सनसनाटी आरोप करत भाजप नेतृत्वाने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. जो माणूस उद्धव ठाकरे यांचा झाला नाही, तो भाजपचा काय होणार? भाजपबरोबर देखील असंच होईल. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी नेतृत्वाने विचार करावा. त्यांचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रात गुंडाराज येईल, असे एकामागून एक सनसनाटी आरोप गणपत गायकवाड यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने कायदा हातात घेणे बरोबर नाही. आपण शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड किंवा स्वत: मुख्यमंत्र्यांची तक्रार आपल्या पक्षनेतृत्वाच्या कानावर घातली होती का? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर गणपत गायकवाड म्हणाले, मी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर बोललो. परंतु माझ्या म्हणण्याची दखल घेतली गेली नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR