मुंबई (प्रतिनिधी) : नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा आपण विरोधही केला आहे त्याबद्दल टीकाही केली. मी मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून किंवा पक्ष फोडला म्हणून टीका केली नाही, असा टोला लगावताना, मोदींमुळे राम मंदिर उभे राहिले आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक आहे त्यामुळे पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण आज केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या घोषणेनंतर आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिका-यांची बैठक घेऊन चर्चा केली. एमआयजी क्लबमध्ये झालेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल स्पष्टीकरण केले. भूमिका बदलली असा माझ्यावर आरोप होत आहे; पण २०१४ च्या अगोदरची भूमिका निवडून आल्यानंतर जर बदलू शकते तर मलाही भूमिका बदलणे आवश्यक असते. मी भूमिका बदलली नव्हती तर धोरणांवर टीका केली होती.
अर्थात टीका करताना मी त्या मोबदल्यात काही मागितले नव्हते. मागच्या ५ वर्षात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याचे मी स्वागत केले आहे. देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषय राहून गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिले आहे. त्या वेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. शरयू नदीत त्यांची प्रेते फेकली गेली होती. राम मंदिरासाठी चाललेले हे दीर्घ आंदोलन न विसरता येणार आहे. आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते, ही वस्तुस्थिती असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.