नागपूर : ‘विदर्भात राज ठाकरेंचा ताफा अडवला तर तेथेच चोप देण्यात येईल’ असा इशारा मनसेच्या पदाधिका-यांनी दिला आहे. त्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. मराठवाड्याच्या दौ-यावर असताना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडविण्यात आला होता. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरमधून मराठवाडा दौरा सुरू केला होता. सोलापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे विधान केले होते. त्यानंतर राज ठाकरेंच्या विरोधात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचा जाब राज ठाकरेंना जागोजागी विचारला जात आहे.
धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. ठाकरे यांनी मुक्काम केलेल्या हॉटेलसमोर मराठा समाजाने राज यांचा निषेध नोंदविला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली होती. त्यानंतर पुढे बीडमध्ये गेल्यानंतरही मराठा समाजाने राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता.
राज ठाकरे यांच्या गाडीवर बीडमध्ये सुपा-या फेकल्या होत्या, त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. खुद्द राज ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सर्व करत आहेत’, असा आरोप केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गाडीवर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न झाला होता.
दररम्यान, मराठवाड्याच्या दौ-यानंतर राज ठाकरे हे लवकरच विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेही आक्रमक झाली आहे. विदर्भात राज ठाकरे यांचा ताफा अडवला तर त्याच ठिकाणी संबंधितांना चोप देण्यात येईल, असा खणखणीत इशारा मनसेचे नागपूर जिल्हाप्रमुख आदित्य दुरुगकर यांनी दिला आहे. यापूर्वी जेव्हा सुरक्षा काढण्यात आली होती, तेव्हा मनसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील बंगल्याला सुरक्षा पुरवली होती.
आताही विदर्भात मनसैनिकांची राज ठाकरे यांना सुरक्षा असणार आहे. विदर्भात आल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा अडवला तर संबंधितांना जागेवरच चोप देण्यात येईल, असेही दुरुगकर यांनी जाहीर केले.