पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी पोलिस खाते कामाला लागले होते. चार तासानंतर त्याला हवेतून माघारी आणण्यासाठी यंत्रणांना यश आले. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ६० दिवस उलटूनही या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात गृहखात्याला अपयश आले आहे. सावंतांच्या मुलाच्या प्रकरणाप्रमाणे गृहखात्याने आंधळेचा शोध घेतला तर त्याला गजाआड करता येईल असा उपरोधिक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी हाणला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील गृहखाते आणि पोलिस किती तत्पर आहेत याचे उदाहरण काल पहायला मिळाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्रीमहोदय तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान हवेतल्या हवेत परत बोलावून राज्यातील यंत्रणेने आपली कुशलता सिद्ध केली. परंतु, याच यंत्रणेला मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा साठ दिवसांपासून सापडत नाही, ही बाब पटण्यासारखी नाही.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, कालच्या घटनेत वरपासून खालपर्यंत यंत्रणा हलली आणि सदर नेत्याच्या पुत्राचे विमान हवेतल्या हवेत परत फिरले. अशाच पद्धतीने गृहखात्याने मन लावून काम केले, तर कृष्णा आंधळे गजाआड होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अतिविशिष्ट लोकांच्या किरकोळ घरगुती कामांसाठी मनापासून झटणारे गृहखाते सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अशीच तत्परता का दाखवत नाही हा खरा प्रश्न आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. तानाजी सावंत यांच्या मुलासाठी या सरकारने काल रान पेटवले होते. पण ६० दिवस उलटूनही कृष्णा आंधळे सापडत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही त्या म्हणाल्या.