22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeराष्ट्रीयपत्नी शरीरसंबंध ठेवत नसेल, तर पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार

पत्नी शरीरसंबंध ठेवत नसेल, तर पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार

भोपाळ : मध्य प्रदेश हायकोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर पत्नी पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत नसेल, तर ती मानसिक क्रूरता झाली, असे हायकोर्टाने म्हटले. त्या आधारावर पती पत्नीपासून घटस्फोट घेऊ शकतो. त्याच्याकडे घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे. पत्नी सतत शरीरसंबंध ठेवायला नकार देत असेल, तर ते पतीला मानसिक, भावनिक त्रास देण्यासारखे आहे. हिंदू विवाह अधिनियम अंतर्गत हे नव-याकडे घटस्फोट घेण्यासाठी सबळ कारण ठरु शकते.

जबलपूरमध्ये न्यायाधीश शील नागू आणि जस्टिस विनय सराफ यांच्या खंडपीठाने सुदीप्तो साहा विरुद्ध मौमिता साहा केसच्या सुनावणीत ही टिप्पणी केली. भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय बदलला. पत्नी शारीरिक संबंध ठेवायला नकार देऊन माझा मानसिक छळ करतेय असं सुदीप्तो साहाने कोर्टात म्हटलं होतं. त्याने न्यायालयात याचिका दाखल करुन पत्नी मौमिताकडे घटस्फोट मागितला होता.

लग्नानंतर किती दिवस संबंध ठेवले नाही?

१२ जुलै २००६ रोजी दोघांच लग्न झालं. याचिकेत म्हटलं होतं की, लग्नाच्या दिवसापासून २८ जुलै २००६ पर्यंत पत्नीने संबंध ठेवले नाहीत. त्यानंतर नवरा देशाबाहेर निघून गेला. कुटुंबाने लग्न जबरदस्तीने लावलं असं मौमिताने मला सांगितलेलं, असं नव-याने याचिकेत म्हटलं होतं. तिच्या मर्जीने लग्न झालं नव्हतं, त्यामुळे मौमिताने शारीरिक संबंध ठेवायला नकार दिला. मौमिताच दुस-या व्यक्तीवर प्रेम होतं. मला प्रियकराकडे पाठव असही मौमिताने नव-याला सांगितलेलं. सप्टेंबर २००६ मध्ये मौमिता भोपाळच घर सोडून निघून गेली, त्यानंतर ती परत आलीच नाही, असं सुदीप्तो साहाने याचिकेत म्हटलं होतं.

हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

या प्रकरणात सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले की, वैवाहिक प्रकरणात मानसिक क्रूरता निश्चित करण्यासाठी कुठला थेट फॉर्म्युला किंवा निकष नाही. योग्य निर्णयासाठी तथ्याच्या आधारावर मुल्यांकन झाले पाहिजे. हायकोर्टाने म्हटलं की, पत्नीने पतीचे दावे खोडून काढले नाहीत. त्यामुळे पतीचा युक्तीवाद फेटाळता येणार नाही. मानसिक क्रूरतेमुळे पतीला पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, असं कोर्टाने म्हटलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR