जळगाव : ज्यांनी विचारांना तिलांजली दिली असेल त्यांना ‘राज ठाकरे जे बोलले असतील ते लागू होईल.’ ३५ वर्षे भगवा झेंडा आणि शिवसेना पक्षासाठी काम केलं, ते विचार आम्ही सोडले नाहीत. ३५ वर्षांत आम्ही लाचार झालो नाही तर आता काय लाचार होणार, असे प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर दिले आहे.
दरम्यान, सध्याचे नेते मिंधे, लाचार आणि पैशांसाठी वेडे झाल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट उत्तर देत म्हणाले, आमच्या पक्षातून बाहेर पडण्यावर राज ठाकरे बोलले असतील तर आम्ही भगव्या झेंड्यासाठी बाहेर पडलो पण आम्ही विचार सोडले नाहीत.
ज्यांनी विचार सोडले असतील त्यांना राज ठाकरे जे बोलले असतील ते लागू होईल, असे स्पष्टपणे गुलाबराव पाटील म्हणाले. तर सध्या सुरू असलेल्या राजकारणामुळे विदर्भ आणि महाराष्ट्राचे तुकडे होतील, असे राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, राज ठाकरे जे बोलले हे त्यांचे विचार आहेत या विचारावर महाराष्ट्र चालेल का? हे मला माहीत नाही.. असा प्रश्न उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना टोलाही लगावला आहे.