16.5 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रजमत नसेल तर स्पष्ट सांगा, चांगले अधिकारी आणतो

जमत नसेल तर स्पष्ट सांगा, चांगले अधिकारी आणतो

अजित पवारांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांना सुनावले

पुणे : राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करणे अवघड जात नाही. पुण्यात कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही. त्यामुळे इतकी मुभा आहे, सोई-सुविधा आहेत असे असतानाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतोय? यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी कमी पडतात असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे या अधिका-यांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे. इतर चांगले अधिकारी आहेत त्यांना या शहरात आणून आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम करू असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांना चांगलेच सुनावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सर्किट हाऊस येथे पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरून पुणे पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. अजित पवार म्हणाले, “शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी कमी पडतात असे माझे स्पष्ट मत आहे. या अधिका-यांनी हे सर्व आमच्या आवाक्या बाहेर असल्याचे सांगावे. इतर चांगले अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी आणू आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम करू. पुणे शहरात आयटी क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात काम करणा-या भगिनींना सुरक्षित वाटले पाहिजे. कोयता गँग, गुन्हेगारी टोळ्या यांना चाप बसलाच पाहिजे. कोयता गँगची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. याविषयी मी वरिष्ठ अधिका-यांसोबत बोलून योग्य तो निर्णय घेणार आहे. पुण्यातील कायदा सुव्यवस्था आणि कोयता गँगची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी देखील घेतली आहे.

या भागाचा प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मी देखील ही बाब गांभीर्याने घेतली आहे. जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठीची खबरदारी आम्ही घेणार, कुठेही कमी पडणार नाही. यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून पुढची पावले उचलणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR