नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आरोग्य विमा किंवा आयुर्विमा नाकारण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशातच क्लेम नाकारण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी विकत घेत असताना दारू पिण्याची सवय लपवून ठेवली तर विमा कंपनी त्याचा क्लेम नाकारू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
एलआयसी कंपनीने एका व्यक्तीचा ‘जीवन आरोग्य’ योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचा क्लेम नाकारला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर एलआयसीचा निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने सांगितले. पॉलिसी विकत घेत असताना सदर व्यक्तीने मद्य पिण्याबद्दल चुकीची माहिती दिली होती, असा आरोप कंपनीने केला. हे प्रकरण २०१३ चे आहे.
एका व्यक्तीने ‘जीवन आरोग्य’ ही पॉलिसी विकत घेतली होती. या पॉलिसीअंतर्गत रुग्णालयाच्या साधारण वॉर्डासाठी प्रतिदिन १००० रुपये आणि आयसीयूमध्ये भरती होण्यासाठी प्रतिदिन २००० रुपये मिळणार होते. पॉलिसी विकत घेतल्यानंतर एका वर्षाने सदर व्यक्तीच्या पोटात दुखायला लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. एक महिन्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
दारू पित असल्याने पॉलिसी लागू नाही
सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने क्लेमसाठी अर्ज केला. मात्र क्लेम फेटाळून लावताना एलआयसीने सदर व्यक्तीने मद्य पिण्याच्या सवयीबद्दलची माहिती लपवली होती. यासाठी एलआयसीने जीवन आरोग्य पॉलिसीमधील नियम ७ (११) चा हवाला दिला. त्यानुसार आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा मद्य, अंमली पदार्थाचा वापर केल्यामुळे या पॉलिसीत समावेश होत नाही. विशेषत: एखाद्या व्यक्तीला दारू प्यायल्याने आजार होत असेल तर त्याला पॉलिसीचा लाभ देण्यास कंपनी बाध्य नाही.