जालना : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्यावरून मराठवाड्यातील नेते आक्रमक झाल्याचे
दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार राजेश टाेपे यांनी या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. आता त्यांच्यापाठोपाठ शिवसेना नेते अजुर्न खाेतकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करायला लावू नका, जायकवाडीसाठी संघटित झालाे तर तुम्हांला परवडणार नाही, असे ते म्हणाले.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, यंदा मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जायकवाडीत हक्काचे पाणी सोडण्यात यावे, असे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. जायकवाडीच्या पाण्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील शेतक-यांना हाेऊ शकताे. परंतु आदेशाला न जुमानता जायकवाडीत पाणी सोडले जात नाही अशी खंत खाेतकरांनी व्यक्त केली. आम्हांला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करायला लावू नका असा इशाराही खोतकर यांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्र्यांशी पाण्यासाठी चर्चा केली जाईल. ते सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही खाेतकरांनी व्यक्त केला. शिवसेना नेते अर्जुन खोतकर म्हणाले की, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. काही वेळापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ताे झाला नाही असेही खाेतकरांनी नमूद केले. नऊ दिवस झाले तरी अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही, असे ते म्हणाले.