मुंबई : छगन भुजबळ यांनी ओबीसी रॅलीत गेल्यावर्षी 16 नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांच्या गौप्यस्फोटानंतर खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली. भुजबळ यांना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी राज्यपालांकडे द्यावा, आम्हाला देखील समाजशास्त्राचा अभ्यास आहे. मुख्यमंत्र्यांकडे देऊन ते नाकारू शकतात. कोणी काहीही करावं पण याठिकाणी प्रामाणिक असावं, महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नये, असा टोला लगावला.
ते म्हणाले की, राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा असतो. जनतेला मूर्ख बनवू नका. काल आम्ही तुमची बाजू घेतली होती. त्यानंतर आता तुम्ही हे बोलला आहात. तुम्ही मंत्रिपद सोडलं आहे का? सरकारी बंगला सोडला आहे का? सरकारनेच जाती जाती सुरु केलं आहे. आज जी भिंत तयार केली ती तुटणार नाही. हजारो वर्षे बहुजन एकत्र राहिले आणि ते ओबीसी आहेत. त्यांच्या कामातून ओळख झाली. मुळ आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले. मी ओबीसी असल्याने मला वाईट वाटतं. हिंदू मुस्लिम परिणाम काय झाले आपण पाहिलं तशीच परिस्थिती होईल, असेही ते म्हणाले. समाजात एकमेकांना गाव सोडावं लागेल. तुम्ही हे का करत आहात? कोणीही कोणासाठी लढत असेल, त्याचा प्रामाणिकपणा दिसला पाहिजे. याठिकाणी भुजबळ खरे नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस होत आहेत. माझ्यावर देखील गुन्हे टाकण्यात आले. माझ्या प्रकरणात माफिच्या साक्षीदाराला अडीच कोटी दिले. महाराष्ट्राने एवढं वैमनस्य कधीच पाहिलं नाही. आम्ही देखील या ठिकाणी विरोध केलाय पण तो विचारांना केला, माणसांना नाही. दरम्यान, आमदार गणपत गायकवाड प्रकरण चुकीचं असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे अतिशय मनाने चांगले व्यक्ती आहे, पण आजूबाजूचा गोतावळ्याने वाटोळं होणार आहे. गायकवाड यांच्यातील वाद कडेला आल्याने हे घडलं आहे. अशी प्रकरणे असतात तेव्हा वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्ती केली पाहिजे. याठिकाणी ठाण्यातील पोलिसांचा वापर केला जातो. माझ्या बाबतीत देखील तेच झालं. माझ्या लोकांना देखील सतवण्यात आले. माझ्यावेळी 354 दाखल झाले, पण पोलिसांनी हतबलतेनं गुन्हा दाखल केला.