19 C
Latur
Wednesday, November 26, 2025
Homeमहाराष्ट्रयापूढे अवैध वाळू वाहतूक वाहन परवाना रद्द करणार

यापूढे अवैध वाळू वाहतूक वाहन परवाना रद्द करणार

वाळू तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली आहेत. आता राज्य परिवहन प्राधीकरणाने वाळू तस्करीत वापरण्यात येणा-या वाहनांविरोधात कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता वाळू तस्करी करणारे वाहन पहिल्यांदा पकडले गेल्यास, परवाना ३० दिवस निलंबित ठेवून वाहन अटकावून ठेवण्यात येणार आहे. दुसरा गुन्हा झाल्यास ६० दिवस परवाना निलंबित व वाहन अटकावून ठेवले जाईल. तर तिसरा गुन्हा झाल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधीकरणाने परवाना रदद करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश राज्य परिवहन प्राधीकरणाने दिले आहेत.

महसूल व वन विभागाने याबाबतचे शासन परिपत्रक जारी केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी वाळू तस्करी करण्यात येत असते. वाळू तस्कर वाळूच्या वाहतुकीसाठी ड्रीलमशीन, जेसीबी पोकलँड, ट्रॅक्टर, ट्रक, डंपर, ट्रॉलर, बार्ज, मोटराईज्ड बोट आदी वाहने वापरत असतात. अनेकदा या तस्करांकडून शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर वाहनेही घालण्यात येतात. त्यामुळे वाळू तस्करी जर रोखायची असेल तर वाहतूक करणा-या वाहनांच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या वाहनचालकांवर-मालकांवर जरब बसावी असा निर्णय राज्य परिवहन प्राधीकरणाने घ्यावा असे निर्देश विभागाने दिले होते. त्यानुसार आता राज्य परिवहन प्राधीकरणाने प्रादेशिक परिवहन प्राधीकरणांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

कशी असेल कारवाई?
१ – वाळू तस्करीचा पहिला गुन्हा करताना पकडले गेल्यास ३० दिवस वाहन परवाना निलंबित व वाहन अटकावून ठेवणे
२ – दुसरा गुन्हा करताना पकडले गेल्यास ६० दिवस वाहन परवाना निलंबित व वाहन अटकावून ठेवणे
३ – तिसरा गुन्हा पकडला गेल्यास वाहन परवाना कायमचा रद्द

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR