जिंतूर : मागील काही दिवसांपासून वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियाची टोळी सक्रिय झाली आहे. मात्र महसूल विभागाने रात्रीचे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक विरोधात कार्यवाही सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३०च्या सुमारास जिंतूर- औंढा रस्त्यावर अवैध वाळू घेऊन जाणारा हायवा पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव झाले नाहीत. मात्र वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाळू माफियाची टोळी सक्रिय झाल्या आहेत. वाळू माफियांनी महसूल, पोलीस प्रशासन यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी आपली माणसे ठेवलेली आहेत. यासाठी संपूर्ण चैन दिवसभर, रात्रीच्या वेळी लक्ष ठेऊन असतात. चोरट्या वाळू विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असते. वाळू माफियांनी वाळू उपसा करून अव्वाच्या सव्वा भावाने वाळूची विक्री करत आहेत. या अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाई करण्यासाठी तहसीलदार राजेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहेत. याच पथकातील नायब तहसीलदार प्रशांत राखे यांना अवैध वाळू घेऊन हायवा जात असल्याचा माहिती मिळताच तात्काळ त्यांचे सहकारी मंडळ अधिकारी रोडगे, तलाठी रुपेश वावळे, सोनूने यांनी कार्यवाही करत हायवा पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे. याबाबत कार्यवाहीचा प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे पाठवला असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे.