सोलापूर : कोट्यवधी विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केवळ मौल्यवान जडजवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, गोशाळा, शौचालय, भक्तनिवास, शेकडो एकर भूमी यांत घोटाळे झाले आहेत. आज देशातील अनेक मोठी मंदिरे फायद्यात असतांना मंदिर समितीच्या आर्थिक बेशिस्तीमुळे मंदिराला वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षात 6 कोटी 5 लाख 82 हजार रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली.
प्रभु श्रीराम, श्रीरामचरीतमानस आदी श्रद्धास्थानांचा सातत्याने होणारा अवमान रोखण्यासाठी तात्काळ रामनिंदाविरोधी कायदा करण्यात यावा, तसेच अयोध्येत उभे रहात असलेल्या श्रीराम मंदिराप्रमाणे देशातील असंख्य हिंदू धार्मिक स्थळे उभारणीतील अडथळा दूर करण्यासाठी प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी हुतात्मा चार पुतळा चौक या ठिकाणी झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली. आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे . विक्रम घोडके, राजन बुणगे, दत्तात्रय पिसे, किशोर जगताप, सौ. राजश्री देशमुख, कु. वर्षा जेवळे, तसेच अधिवक्ता अर्चना बोगम यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी सर्वश्री रमेश झुंजा, अभिमन्यू सरडे, जयराज गावडे, नरसिंग दासरी, मिलींद राऊत, महेश वडतिले, शुभम रोहिटे, विनायक गंजी, शैलेश गड्डम यांच्यासह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. आंदोलनातील विविध मागण्यांची निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली.