नागपूर : दहशतवाद्यांना मांडीवर बसवणा-या पाकड्यांना भारताने चांगलीच अद्दल घडवली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने पाक सरकार आणि लष्कराच्या इभ्रतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली. पाकची आता जलकोंडी करण्यात येणार आहे. तर ऑपरेशन सिंदूरचा पार्ट-२ कधी पण सुरू होण्याची भीती पाकिस्तानी नेत्यांना सतावत आहेत. त्यातच बीड येथील गुंडाराज, राजकीय गुन्हेगारी, गावागावातील दादा, भाईंनी उच्छाद माजवला आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ बीडमध्ये राबविण्याची मागणी केली आहे.
बीड हा गुंडगिरीचा जिल्हा म्हणून राज्यात बदनाम केला तो राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांनी. त्यांच्या दहशतीने येथील सर्वसामान्यांचे जगणे अस केले आहे. राजकीय नेत्यांचे वरदहस्त असलेले अनेक अण्णा येथे आहेत. आका येथे आहेत. कुणाचाही जीव घेण्यात त्यांना काहीच वाटत नाही. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख अजूनही कमी झाला नसल्याचे चित्र काल काही तरुणांनी एका तरुणाला केलेल्या अमानुष मारहाणीवरून समोर आले आहे. बीडमधील परिस्थिती भयानक असल्याचे मारहाणीच्या व्हीडीओवरून दिसून येते.
यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनीच राजकीय नेत्यांच्या दहशतीने प्रकरणात तपास केला नसल्याचे उघड झाले. जनरेट्यापुढे झुकत अनेक बडे चेहरे सध्या तुरूंगात आहे. पण अजूनही मसल्स आणि मनी पॉवरपुढे सर्वसामान्यांचे काहीच चालत नसल्याचे बीडमधील अनेक प्रकरणावरून समोर आले आहे. बीडमध्ये मध्यंतरी एकामागून एक दादा भाईंच्या दहशतीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. पण तरीही थातूरमातूर कारवाई पलीकडे ठोस असे काही घडत नसल्याचे दिसून आले आहे.
बीड, परळी दहशतीचा अड्डा
जसे आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते, तसेच महाराष्ट्राच्या बडमध्ये केले पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. बीडचा परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झालेला आहे आणि खरंच याला आता अतिशय गंभीर ते ना घ्यायला हवे. कारण कालची जी मारहाण झाली. त्याच्यात सगळे मुले अतिशय छोटी होती. १८ वर्षाच्या आसपासचे होते. जसा आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केला होता तसाच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केला पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीने एकच खळबळ उडाली आहे. तर काहींनी त्यांची ही मागणी रास्त असल्याचे समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या आहेत.