मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसातच ईडीने घोटाळ्याचा ठपका ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्याहीपूर्वी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच करवसुलीसंदर्भात आक्षेप घेत काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने आपले मुखपत्र ‘सामना’तून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
‘‘भाजपने देशात सर्वच स्तरांवर आर्थिक अफरातफर केली आहे. त्याच अफरातफरीच्या पैशांवर त्यांचे राजकारण सुरू आहे. सीएसआर फंडातही भाजपने हात मारला आहे आणि हा आकडा १ कोटी १४ लाख ४७० इतका आहे. मनमोहन सरकारने २०१३ मध्ये एक कायदा केला. प्रत्येक कंपनीला २ टक्के लाभाचा पैसा सीएसआर म्हणजे जनकल्याणाच्या कार्यात द्यावा लागेल. हा पैसा लोकांसाठी वापरायचा होता, पण भाजपने हा पैसा त्यांच्या खासगी संस्था, स्वत:ची प्रसिद्धी व इतर बनावट कार्यात वापरला.
त्यांच्या मर्जीतल्या विश्वस्त संस्था, एनजीओच्या खात्यात हा पैसा वळवून दुस-या मार्गाने त्याच कंपन्यांच्या मालकांना लाभ मिळवून दिले. यातील पैसा परदेशातही गेला. आंगडियांचा वापर करून ‘मनी लाँडरिंग’ झाले. पण येथे ना ‘ईडी’ घुसली ना तुमचे इन्कम टॅक्सवाले,’’ असं ठाकरे गटाने म्हटले आहे.
८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा गेल्या कुठे?
नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बँकेतून ५०० च्या ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा गायब झाल्या. नव्याने छापलेल्या त्या नोटा रिझर्व्ह बँकेत पोहोचल्याच नाहीत. हे पैसे मध्येच गायब झाले. या पैशांना कोठे पाय फुटले? जर हे सर्व खरे असेल तर त्याबाबत काय कारवाई झाली? हे पैसे कुणाच्या खात्यात गेले की घशात गेले? यावर काहीच खुलासा झालेला नाही. हे भारतीय जनता पक्षाचे पाप आहे,’ अशा शब्दांमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.