कोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये आणखी एका रत्नागिरीतील डॉक्टरला करवीर पोलिसांनी अटक केली. डॉ. विजय गोपाळ नारकर (वय ६३, रा. साखरपा, ता. देवरुख, जि. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. डॉ. नारकर याच्या दवाखान्यातून गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.
त्याला काल न्यायालयात हजर केले असता ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, साधारण दोन महिन्यांपूर्वी नवीन वाशी नाका परिसरात अवैध गर्भंिलग निदानाचे रॅकेट पोलिस आणि आरोग्य विभागाने छापा टाकून उघडकीस आणले होते. त्यामध्ये आजपर्यंत आठ संशयितांना अटक झाली आहे. त्यामध्ये एक कोकणातील डॉक्टर आहे. त्याचा पुढील तपास करताना पुन्हा एका डॉक्टराला अटक केली. त्यामुळे या रॅकेटमधील हा नववा संशयित आहे. तपास सुरू असताना कोकण आणि कोल्हापूर अशी साखळी असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार अधिक चौकशी केली असता रत्नागिरीतील साखरपा येथील डॉ. विजय नारकर याचे नाव पुढे आले. चौकशीत डॉ. नारकर याने आजवर अनेक महिलांचा अवैध गर्भपात केल्याचे दिसले आहे. त्यामुळे त्याला अटक केली आहे. डॉ. नारकरला अटक केल्यानंतर दवाखान्याच्या झाडाझडतीत गर्भपातासाठी वापरल्या जाणा-या औषधांचा साठा मिळाला आहे. तसेच त्याच्याकडे आणि त्याच्याकडून अवैध गर्भलिंग आणि गर्भपातासाठी रुग्णांना पाठविणारे एजंट आणि गर्भपाताच्या औषध विक्रेत्यांचीही माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
नारकरकडे बीएएमएसची पदवी
तपास अधिकारी युनूस इनामदार यांनी सांगितले की, डॉ. नारकर याच्याकडे बीएएमएसची पदवी आहे. त्याचे सध्या ६३ वय आहे. तो गेल्या ३४-३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत आहे. रत्नागिरी-कोल्हापूर असा अवैध गर्भलिंग निदानातील रॅकेटचा प्रवास आहे. त्यामध्ये डॉ. नारकरची भूमिका असल्याचे दिसून आले आहे. कोल्हापूरसह परिसरातील जिल्ह्यांतील रुग्णांची त्याच्याकडे वर्दळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
वितरकांचा होणार भांडाफोड
जे औषध विक्रेते डॉ. नारकर याच्या संपर्कात होते. त्यांच्याकडेही अधिक चौकशी होणार आहे. नियमानुसार त्यांनी औषध पुरवठा केला आहे काय? त्यांच्याकडून दिल्या जाणा-या औषधांचा गैरवापर केला जात होता काय? त्यासाठी आवश्यक सर्व नियमावलींचे पालन केले जाते काय? याचीही माहिती वितरकांकडून घेणार असल्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.