सांगली : गेल्या काही दिवसांमध्ये कौटुंबिक वाद विवादातून होणा-या गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात पत्नीने मुलालासोबत घेत आपल्याच पतीला जिवे मारल्याची भयानक घटना घडली आहे.
आरोपी पत्नीने पतीवर झालेल्या कर्जाचा डोंगर आणि कर्ज फेडण्यासाठी सातत्याने येत असलेल्या दबावाला कंटाळून तसेच पतीच्या विम्याचे पैसे त्याच्या मृत्यूनंतर आपल्याला मिळावेत या हेतूने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी या महिलेने स्वत:चा मुलगा आणि त्याच्या मित्रांना मदतीला घेतल्याचे तपासामधून समोर आले आहे.
कुटुंबातील नात्यांना कलंक लावणा-या या धक्कादायक घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बाबुराव पाटील असे आहे. बाबुराव पाटील यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी वनिता पाटील, मुलगा तेजस पाटील आणि त्याचा मित्र भीमराव हुलवान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी सुरुवातीला बाबुराव पाटील यांचा मृत्यू हा अपघाती असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी करून तपास केल्याने आरोपींचे बिंग फुटले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बाबुराव पाटील हे कर्जबाजारी झालेले होते. तसेच त्यांना कर्ज देणारी मंडळी त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होती. मात्र बाबुराव पाटील यांच्याकडे काही विमा पॉलिसी होत्या. या पॉलिसींचे पैसे मिळवण्यासाठी बाबुराव पाटील यांची हत्या करून त्यांच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा डाव त्यांच्या पत्नीने आखला. बाबुराव पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला, असे भासवण्यासाठी आरोपींनी रस्त्याच्या दुभाजकावर डोकं आपटून त्यांची हत्या केली.
त्यानंतर पोलिसांनीही सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती.
मात्र पोलिसांना बाबुराव पाटील यांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी अधिक तपास केला. तसेच मुलगा तेजस पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मृत बाबुराव पाटील यांची पत्नी वनिता पाटील आणि तेजस पाटील याचा मित्र भीमराव हुलवान यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या तिघांनीही आपण बाबुराव पाटील यांची दुभाजकावर डोकं आपटून हत्या केल्याची कबुली दिली.