22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयहमाससोबतच्या लढाईत २१ इस्रायली जवान शहीद

हमाससोबतच्या लढाईत २१ इस्रायली जवान शहीद

जेरूसलेम : गाझामध्ये हमाससोबत झालेल्या लढाईत त्यांचे २१ सैनिक मारले गेले असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. लढाई दरम्यान एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे काही सैनिक जखमी झाले. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यामध्ये दोन इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याच वेळी इस्रायली सैन्याच्या टँकवर हमासच्या सैनिकांनी आरपीजीसह हल्ला केला. या सैनिकांच्या मृत्यूनंतर हमाससोबतच्या लढाईत आतापर्यंत इस्रायली लष्कराचे २०० पेक्षाही अधिक सैनिक मारले गेले आहेत.

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अ‍ॅडमिरल डॅनियल हगरी यांनी सांगितले की, या घटनेत एकूण २१ सैनिक मारले गेले. सीमेवर सुमारे ६०० मीटर परिसरात सैनिक तैनात होते. तेथील सैनिक हमासच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करत होते. दुपारी चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी आरपीजीने हल्ला केला. दरम्यान, दोन मजली इमारतींमध्ये स्फोट झाला. त्यानंतर इमारती कोसळल्या. या इमारतींच्या ढिगा-याखाली दबून जवानांचा मृत्यू झाला होता.

इजिप्तचा इस्राइलला इशारा

फिलाडेल्फिया कॉरिडॉर हा दोन्ही देशांच्या सीमेवरील जमिनीचा तुकडा इस्राइलने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात, असा इशारा इजिप्तने इस्राइलला दिला आहे. फिलाडेल्फिया कॉरिडॉर हा इजिप्त आणि इस्राइलमधील १४ किलोमीटर लांबीचा परिसर आहे. या भागातून गाझामध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी होत असल्याने इस्त्रायली लष्कर या भागाचा ताबा घेण्याचा विचार करत आहे. सीमेवरील लष्करी कारवाईमुळे मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी आपल्या हद्दीत घुसू शकतात, अशी इजिप्तला चिंता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR