पुणे : ससून रुग्णालयात घडलेले ड्रग्ज प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई झाली. दोन जणांना बडतर्फ करण्यात आले. परंतु या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी दोषी होते. त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. आता पुणे पोलिस ऍक्शन मोडवर आले आहेत. ललित पाटील याच्यावर उपचार करणारे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह ससूनमधील डॉक्टर, एक्स-रे तंत्रज्ञ, लेक्चरर यांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आता ससूनमध्ये काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो तीन वर्षांपासून येरवडा कारागृहात होता. परंतु तीन वर्षांतून नऊ महिने त्याने ससूनमध्ये काढले. या ठिकाणी त्याला सर्व सुखसोयी मिळत होत्या. तो रुग्णालयातून फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांवर टीका सुरू झाली. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यामुळे त्याचे एक, एक प्रकरण समोर येऊ लागले. त्याला मदत करणारे सर्वच पोलिसांच्या रडारवर आले.
ससूनमध्ये पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ललित पाटील याच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजीव ठाकूर आणि त्यांच्या पथकातील डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांपासून गुप्तपणे ही चौकशी सुरू केली आहे. या चौकशीनंतर पोलिसांकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ससून आणि कारागृह प्रशासनातील शीतयुद्ध
ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी ललित पाटील याला उपचारासाठी ससून रुग्णालयात ठेवा, असे पत्र दिले होते. त्यानंतर आता कारागृह प्रशासनाचे पत्रही व्हायरल झाले आहे. त्यात कारागृह प्रशासनाने ललित पाटील याला उपचारासाठी तुमच्याकडे राहू द्या, असे म्हटले आहे. यावरुन ससून आणि येरवडा प्रशासन यांच्यातील मिलीभगत समोर आली आहे.