पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्रीविठ्ठलचा प्रसाद म्हणून अल्पमूल्य देणगी आकारून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. चैत्री वारीसाठी ३ लाख बूंदी लाडू प्रसाद व ५० हजार राजगिरा लाडू प्रसाद तयार केल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. लाडूमध्ये काजू, बदाम वापरण्यात आले असून, पॅकिंगही यंदा कागदी पिशव्यामध्ये केल्याचे सांगण्यात आले.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माधी व चैत्री अशा चार प्रमुख यात्रा भरतात. त्यामध्ये तुलनेने संख्यात्मकदृष्ट्या कमी असणारी चैत्री यात्रा शुक्रवार, दि. १९ एप्रिल २०२४ रोजी होत आहे. या यात्रेला पंढरपूर शहरात सुमारे दोन ते तीन लाख भाविक असतात. त्यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून एमटीडीसी भक्त निवास येथील लाडू उत्पादन केंद्रात तयार केला जातो. तसेच राजगिरा लाडू प्रसाद हा आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे.
वारीला येणारा प्रत्येक भाविक हा लाडू प्रसाद खरेदी करत असतो आणि या भाविकांना पुरेशा प्रमाणात लाडू प्रसाद उपलब्ध व्हावा, असे नियोजन मंदिर समितीमार्फत करण्यात आले आहे. या बुंदी लाडू प्रसादासाठी सुमारे ५० कर्मचारी, स्वयंसेवक सेवा देत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बुंदीलाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पश्चिमद्वार व उत्तरद्वार येथे कायमस्वरूपी लाडू स्टॉल उभा करण्यात आले असून, हे स्टॉल सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत.बुंदी लाडू प्रसादासाठी चांगल्या दर्जाची कोरडी हरभरा डाळ, डबल रिफाइंड शेंगदाणा तेल, बेदाणा, काजू, वेलदोडे, रंग, सुपर एस. साखर इत्यादी घटक पदार्थांचा व पॅकिंगसाठी पर्यावरण पूरक कागदी पिशव्यांचा वापर करण्यात येत आहे.