नाशिक : कधीकाळी निवडणुकीत गुलालाचा ट्रेंड होता. आता बदलत्या काळानुसार फुलांचे हार-तुरे यांचा मान वाढला आहे. त्यामुळे फुलांच्या शेतीला चांगला भाव आला आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी फुलांच्या हारांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निफाड, जानोरी, मखमलाबाद येथील फूलशेती करणा-या शेतक-यांकडे फूल व्यावसायिकांनी आताच मागणी नोंदवली आहे.
निवडणूक असो, उत्सव असो किंवा आणखी कोणा नेत्याची सभा सध्या क्रेनचा वापर करत फुलांचा मोठा हार, जेसीबीला लावून तयार करण्यात आलेला स्वागत हार तसेच कोणा नेत्यासाठी तयार करण्यात आलेला हार असे हारांचे नवे प्रकार उदयास आले आहेत. तसेच फुलांच्या पाकळ्यांनादेखील मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जेसीबी, क्रेनमधून फुलांची उधळण करण्यात येत असते. त्यासाठी पाकळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
शहरातील फूल व्यावसायिकांनादेखील निवडणुकांमुळे सुगीचे दिवस आले आहेत. फूल व्यावसायिकांनी इव्हेंटच्या माध्यमातून आता राजकीय पक्षांच्या चिन्हांचे, पक्षाच्या झेंड्याच्या थीमचे हार करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रकारे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रंगसंगतीचे व्यवस्थापन करून हार करण्यात येत असतात. त्याच्यासाठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे.