सोलापूर : शहराबरोबरच ग्रामीण भाागतही जागा, घर, शेत खरेदीला नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दस्त नोंदणीतून आतापर्यंत ३३१.२२ कोटींचा महसूल मिळाला आहे. आम्हाला एकूण ६०० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. निवडणुकीच्या काळात दस्त नोंदणीस प्रतिसाद कमी मिळाला. आता नव्या वर्षात दस्त नोंदणीत वाढ होईल असे मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश खोमणे यांनी सांगीतले.
जिल्ह्यात सध्या सोने गुंतवणुकीनंतर जागा खरेदी, घर खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीत दस्त नोंदणीसाठी नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कार्यालयात म्हणावी तशी गर्दी नव्हती. नोव्हेंबर अखेर एक लाखांहून अधिक दस्त नोंदणी झाली आहे. त्यातून ३३१.२२ कोटींचा महसूल शासनास मिळाला आहे.
जानेवारीनंतर व एप्रिल महिन्याअगोदर दस्त नोंदणीत वाढ होईल असेही सांगण्यात आले. सात महिन्यांत तब्बल ५५.२० टक्के वसुली म्हणजेच ३३१.२२ कोटींचा महसूल शासनास जमा झाला आहे. दरम्यानच्या काळात ‘अभय’ योजना दोन ते तीन वेळा देण्यात आली. त्यात ही दस्त नोंदणीत वाढ झाली. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या काळात विधानसभेची रणधुमाळी सुरू होती. सर्वांचेच लक्ष निवडणुकीकडे लागले होते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात दस्त नोंदणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
आता विधानसभेची निवडणूक संपली आहे. त्यामुळे सोलापूरकर पुन्हा दस्त नोंदणीकडे वळू लागले आहेत. येत्या तीन ते चार महिन्यांत ख-याअर्थाने दस्त नोंदणीला मोठी गर्दी होईल. उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल शासनाला जमा होईल असेही सांगण्यात आले.
कोरोनाच्या काळात सोलापूरकरांनी दस्त नोंदणी, घर खरेदी, जागा खरेदीकडे फारसे लक्ष दिले नाही. कोरोनानंतर जागा, घरांच्या किमती कमी होतील, घर कोणी घेणार नाही असे वाटत होते. मात्र कोरोनानंतर घर खरेदी, जागा खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.