मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते तथा राज्याते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आज अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले. अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी धनंजय मुंडे हे दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. धनंजय मुंडे अचानक अजित पवारांच्या भेटीला का गेले, याचे कारण समजू शकलेले नाही. धनंजय मुंडे यांनी अचानक अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील तिथे दाखल झाले. त्यामुळे अजित पवारांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आलेला बघायला मिळत आहे. तीनही नेत्यांमध्ये नेमका काय खल सुरु आहे, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. पण राज्यातील घडामोडी पाहता काही तरी नव्या घडामोडींचे हे संकेत तर नाहीत ना, अशी चर्चा आता सुरु आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ््या घडामोडी घडताना दिसत आहेत. या दरम्यान धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावरूनही राजकारण तापले आहे.