नवी दिल्ली : इंग्लंडने ओमानचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. आदिल रशीदच्या ४-११ च्या चमकदार कामगिरीमुळं इंग्लंडने गुरुवारी ओमानला ४७ धावांत गुंडाळून टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ टप्प्यात पोहोचण्याच्या आपल्या शक्यता बळकट केल्या आहेत.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून ओमानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या धारदार गोलंदाजीसमोर ओमानचे फलंदाज चांगलेच फसले. तो १३.२ षटकांत अवघ्या ४७ धावांवर ऑलआऊट झाला. ओमानकडून शोएब खानने सर्वाधिक ११ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय मार्क वूड आणि जोफ्रा आर्चरनंही ३-३ बळी घेतले. ज्या खेळपट्टीवर ओमानचे फलंदाज सतत संघर्ष करताना दिसत होते. त्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी कहर केला. इंग्लंडने अवघ्या ३.१ षटकात लक्ष्याचा पाठलाग केला, ज्यामुळं त्यांच्या निव्वळ धावगतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. कर्णधार जोस बटलरनं ३०० च्या स्ट्राईक रेटने ८ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. फिल सॉल्टनं ३ चेंडूत १२ तर जॉनी बेअरस्टोनने २ चेंडूत ८ धावा केल्या. ओमानकडून बिलाल खान आणि कलीमुल्ला यांनी १-१ बळी मिळवला.
सर्वात मोठा विजय नोंदवला
इंग्लंडने ओमानचा पराभव करून टी-२० मधील सर्वात मोठा विजय (१०१ चेंडू शिल्लक असताना) नोंदवलाय. त्यांचा यापूर्वीचा सर्वात मोठा विजय (७० चेंडू शिल्लक असताना) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध होता.