26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रपवार आणि काँग्रेसचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात

पवार आणि काँग्रेसचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात

बड्या नेत्याचा दावा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप

मुंबई : महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्याने आपले पुढील भवितव्य काय असेल याची काळजी विरोधी पक्षातल्या आमदारांना लागून राहिली आहे. त्याच विवंचनेतून ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. आमच्याशी व्यक्तिगत संबंध असलेले काँग्रेस आणि शरद पवार गटातील अनेक आमदार आम्हाला संपर्क करीत आहेत.

लवकरच ते आमच्याकडे येतील, असा दावा अजित पवार गटाचे मावळते विधिमंडळ गटनेते अनिल पाटील यांनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २४ तासही उलटत नाही तोच महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत अनिल पाटील यांनी दिल्याने सामान्य जनतेला फोडाफोडीचे राजकारण अजूनही पाहायला मिळणार असल्याचे दिसते. नेहमीप्रमाणे मतदारसंघाचा विकास आणि निधीचे कारण पुढे कारण संबंधित आमदार पलटी मारू शकतात असे थेट संकेत अनिल पाटील यांनी दिले आहेत.

अनिल पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातील काही लोकांशी आमचे जवळचे संबंध असल्याने सत्तागटात येण्यासाठी ते इच्छुक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे काही लोक आमच्या संपर्कात असून पुढील काहीच दिवसांत त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील असे अनिल पाटील म्हणाले.

केवळ शरदचंद्र पवार पक्षाचेच नव्हे तर काँग्रेस पक्षातील काही लोक आमच्या संपर्कात आहेत, असे आवर्जून अनिल पाटील यांनी सांगितले. शेवटी लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघाचा विकास करायचा असतो. सत्तेसोबत जाणे हे कुणालाही बरे वाटते. शपथविधीची प्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात संबंधित आमदार निर्णय घेऊ शकतात. पाच ते सहा आमदार आमच्याकडे येऊ शकतात, असे अनिल पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन २४ तासही झाले नाहीत, लगेच त्या आमदारांना अस्वस्थ व्हायला काय झाले? असे विचारले असता, सत्तेचे समीकरण कुणालाही प्रिय असते. आम्ही आग्रह करायला कुणाकडे जाणार नाही, पण पुढच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून पुढच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेऊन जर जनतेच्या दारात जायचे असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. दारूण पराभवानंतर आपले भवितव्य काय असेल, याची काळजी आमदारांना आहे असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR