धाराशिव : प्रतिनिधी
प्लॉट विक्रीच्या संमत्तीपत्रावर सही करा, असे म्हणून तिघांनी एका वृद्धाला सतत मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तुळजापूर येथील एका ७३ वर्षीय नागरिकाने विषारी गोळ््या खाऊन आत्महत्या केली. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. सतीश गंगाराम कदम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाणे येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर शहरातील भगवती विहिरीजवळ राहणारे सतीश गंगाराम कदम (वय ७३) यांनी २४ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत विषारी गोळ्या घेवून आत्महत्या केली. आरोपी किसन भाऊराव डोंगरे, गणेश उर्फ गणराज किसन डोंगरे, नागेश डोंगरे (सर्व रा. तुळजापूर) यांनी मयत सतीश कदम व त्यांच्या मुलाची भेट घेवून एकत्रित घेतलेल्या जमिनीवर प्लॉट विक्रीच्या संमती पत्राावर सही करा, असे म्हणून मानसिक त्रास दिला. त्यांच्या जाचास व त्रासास कंटाळून सतीश कदम यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी प्रसाद सतिश कदम यांनी दि. ३० नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.