नांदेड : प्रतिनिधी
पक्ष संघटनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. अधिवेशन संपल्यानंतर राज्यभर दौरा करण्यात येईल. यावेळी जे पदाधिकारी निष्क्रिय आढळून येतील त्यांना कार्यमुक्त केले जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरसी येथील भर कार्यक्रमात रविवार दि. २३ मार्च रोजी दिला.
दरम्यान महायुतीचे सरकार ५ वर्ष टिकेल असा विश्वासही व्यक्त केला. राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे रविवारी कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पवार म्हणाले, लोकसभेला यश मिळाले नाही परंतू विधानसभेत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. याबळावर महायुतीचे सरकार ५ वर्षे राहणार आहे.
जातीय सलोखा कायम राहिला तर उद्योगपती गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतील. लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजेत, पण राज्याचा विकासही झाला पाहिजे. या कार्यक्रमाचे निरीक्षण करून उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची चांगली हजेरी घेतली.
निवडणुकीची तयारी करा
अधिवेशन संपल्यानंतर जिल्हानिहाय दौरे करण्यात येतील. पक्षवाढीसाठीचे काम नांदेड जिल्हात चांगले चालले आहे, चिखलीकर व त्यांचे कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत. मात्र इतर ठिकाणी पक्ष वाढीसाठी जे निष्क्रय ठरतील त्यांना पदमुक्त करू असा इशारा दिला. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करा, यश नक्की मिळेल असे आवाहन पवार यांनी केले. तर यावेळी बोलताना आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप खा. अशोकराव चव्हाण यांच्यावर टिका करण्याची संधी सोडली नाही.