सोलापूर – शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व चार हुतात्मा पुतळा सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्रीकिसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा अ. कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वंशज अन्नपूर्णा धनशेट्टी व हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दीनानाथ शिंदे तसेच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे वंशज (मुलीचा मुलगा) हसीमोद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, नगर अभियंता सारिका आकुलवार, उपअभियंता किशोर सातपुते, कनिष्ठ अभियंता परशुराम भूमकंटी, बिरू बंडगर, विजयकुमार गावडे आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील वारसा स्थळांपैकी एक असलेल्या महापालिका इंद्रभुवन या इमारतीच्या नूतनीकरण कामास पालकमंत्री पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी नूतनीकरण संदर्भातील माहिती त्यांना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, उपअभियंता युसूफ मुजावर आदी उपस्थित होते.