सोलापूर-
तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील श्री गुरुदेव सेवा संस्थेच्या समाधान केंद्रामध्ये निर्माण करण्यात आलेल्या ध्यान मंदिराचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच या निमित्ताने प्रवचन कार्यक्रमही होणार आहे, अशी माहिती डॉ. शिवरत्न शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामी यांनी स्थापन केलेल्या समाधान केंद्रातील ध्यानमंदिराचे उद्घाटन शुक्रवार, दि. १६ फ ैब्रुवारी रोजी आडवी सिध्देश्वर मठाचे निरुपाधीश्वर महास्वामी, पंचमठ संस्थांनचे संगमेश्वर शिवाचार्य महास्वामी, जगदीश्वर हिरेमठ मसुती येथील प्रभूकुमार शिवाचार्य महास्वामी, वीरक्त मठाचे सदाशिव महास्वामी, श्री हिरेमठ जडे येथील घनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विठ्ठल रखुमाई मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखालीहा सोहळा होणार आहे. यावेळी पूज्य महास्वामी जंगम महापूजा होणार आहे.
याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, आ. सचिन कल्याणशेट्टी, डॉ. शिवरत्न शेटे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, दि. ९ ते १४ फेब्रुवारीदरम्यान रोज सायंकाळी ६ते ८ वाजेपर्यंत प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ जगद्गुरु मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या पावन उपस्थितीत दि. ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. श्रीमद रंभापुरी पीठाचे प्रशस्ती पुरस्कृत शांतवीर शिवाचार्य महास्वामी यांचे प्रवचन होणार आहे.
गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता माझे आरोग्य माझ्या हातात (घरगुती उपचार) या विषयावर डॉ. हणमंत मळली यांचे तर सायंकाळी ७ वाजता चला संस्कार घडवूया या विषयावर डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस शरणवसप्पा दामा, महेश पाटील, संगनबसवा स्वामी, प्रशांत बेत, दत्तकुमार साखरे, राजशेखर शेट्टी, मल्लिनाथ बिराजदार, सोमशेखर तेल्लुर, महालिंग परम शेट्टी, प्रकाश खोबरे आदी उपस्थित होते.