परभणी / प्रतिनिधी
केंद्रीय बियाणे अधिनियम १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५ पिकांच्या वाणाचा समावेश भारताच्या राजपत्रात करण्यात आला. याबाबत कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (अ) हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित हरभ-याचा परभणी चना (बीडीएनजी २०१८-१६), सोयाबीनचा एमएयुएस-७३१, देशी कपासीचा, अमेरिकन कपासीचा आणि तीळाचा टीएलटी-१० या वाणांचा समावेश आहे.
देशाच्या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेश केल्यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणावर होण्यास मदत होवून शेतक-यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले. त्यांनी हे वाण विकसित करण्यास योगदान देणारे मुख्य शास्त्रज्ञ डॉ खिजर बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाने, डॉ डि. के. पाटील, डॉ एस. पी. मेहत्रे, डॉ.व्ही. के. गीते, डॉ.मोहन धुप्पे आदीसह सर्व संबंधित शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
या वाणातील हरभरा, अमेरिकन कापूस आणि तीळाच्या वाणास महाराष्ट्र राज्याकरिता लागवडीकरिता प्रसारण करण्याची मान्यता देण्यात आली आहे तर सोयाबीनच्या वाणास महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्रासाठी लागवडीकरिता मान्यता मिळाली आणि देशी कपासीचा वाणास दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्याकरिता लागवडीस मान्यता प्राप्त झाली. देशाच्या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेशामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे मुख्य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार असल्याची माहिती संशोधन संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ खिजर बेग यांनी दिली.
पाच वाणाची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे परभणी चना : सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो. मर रोगास प्रतिबंधक असून दाणे टपोरे आहेत. १०० दाण्याचे वजन २९ ग्रॅम भरते. सोयाबीन वाण : सोयाबीनचा हा वाण लवकर येणारा असून परिपक्वतेसाठी ९४ ते ९८ दिवस लागतात. उत्पादकता २८ ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी आहे. तेलाचे प्रमाण २०.५ टक्के तर प्रथिनांचे प्रमाण ४०.५ टक्के आहे. देशी कपासीचा वाण : या वाणाची उत्पादकता १५ ते १६ क्विंटल प्रति हेक्टर असून रुईचा उतारा ३५ ते ३६ टक्के आहे. अमेरिकन कपासीचा वाण : या वाणाची उत्पादकता १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टर असून रुईचा उतार ३७ ते ३८ टक्के आहे. तीळाचा वाण : या वाणामध्ये तेलाचे उत्पादन सरस असून खरीप, रबी व उन्हाळी हंगामामध्ये लागवडीस योग्य आहे.