पंढरपूर /प्रतिनिधी
चैत्री यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले. यासोबतच सोन्या-चांदीचे दागिनेही अर्पण केले. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिरे समितीस २ कोटी ५६ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोप-यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. दि. ३० मार्च ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ २ कोटी ५६ लाख रुपये अर्पण केले. यात ६३९९७७९ रुपये देणगी, २६२१००० रुपये लाडू प्रसाद विक्री, ३४३४७०८ रुपये भक्तनिवास, २९२२१०० पूजेच्या माध्यमातून, ६४८५२०४ रुपये हुंडीपेटी, १६४७७४ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून १०६८३९८ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी २६१०३९६ रुपये देणगी, लाडूप्रसाद विक्रीतून १९०६०००, भक्तनिवास ७५२२९८ रुपये, २१००० रुपये पूजेच्या माध्यमातून, ४६८४१२४ रुपये हुंडीपेटीतून, ८९२५९ रुपयाचे सोने-चांदीचे दागिने अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून २६१०७११ रुपये प्राप्त झाले होते. मागील वर्षी श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने दि. १५ ते २१ एप्रिल २०२४ दरम्यान चैत्री यात्रेच्या वेळी पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध होते.
गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट
२०२४ च्या चैत्री यात्रेत १२६७३७८८ रुपये व या वर्षीच्या यात्रेत २५६५५०५५ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाली. मागील यात्रेच्या तुलनेत दुप्पट म्हणजेच १२९८१२६७ इतकी वाढ झाल्याचे दिसून आले. या दानातून श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे श्रोत्री म्हणाले.