22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंच्या अडचणीत वाढ; दोन दिवसांत पाच गुन्हे

जरांगेंच्या अडचणीत वाढ; दोन दिवसांत पाच गुन्हे

बीड : प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करणा-या मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कारण बीड जिल्ह्यात जरांगे यांच्यावर दोन दिवसांत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची नोटीस न स्वीकारणे, प्रक्षोभक भाषण करणे तसेच खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत जरांगे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, २०२४ मध्ये बीड जिल्ह्यात जरांगे यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनोज जरांगे यांच्याकडून मागील काही दिवसांपासून राज्याचा दौरा केला जात आहे. याच दौ-याच्या निमित्ताने जरांगे मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात होते. या काळात त्यांनी मराठा समाजाच्या बैठका घेत काही ठिकाणी सभा देखील घेतल्या. दरम्यान, यावरून पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, जिल्ह्यात घेतलेल्या बैठकांमध्ये जरांगे-पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणे, प्रक्षोभक भाषण करणे, खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांत असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. याच अनुषंगाने जरांगे-पाटील यांना नोटीसही पाठवली होती, परंतु ती त्यांनी घेतली नसल्याचा देखील आरोप आहे.

अशोक चव्हाण जरांगेंच्या भेटीला…
बीड जिल्ह्याचा दौरा केल्यावर शनिवारी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत दाखल झाले. दरम्यान, शनिवारी रात्री भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री दीड वाजता संपली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. तर, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे म्हणत जरांगे यांनी सरकारविरोधात आपली नाराजी बोलून दाखवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR