छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यात वातावरणात चांगलेच बदल झाले असून थंडीत वाढ होत असताना बाजारात धान्याच्या दरांवरही परिणाम होत आहे. यात बाजरीच्या दरात कमालीची वाढ झाली असून, बाजार समितीत बाजरीला व्यापा-यांनी २ हजार ७०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर देत शेतक-यांकडून खरेदी केली.
दुसरीकडे किरकोळ बाजारातही बाजरी ३५ आणि ४० रुपये प्रतिकिलो या दरात उपलब्ध आहे. येत्या काळात या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यदायी मानले जाते. यातून बाजरीला मागणी वाढते. यंदाही ही स्थिती निर्माण झाली असून, बाजारात दिवाळीपासूनच बाजरीचे दर वाढल्याचे सातत्याने समोर येत आहे.
गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. बाजरीचे दर गव्हापेक्षा अधिक असल्यामुळे चपातीपेक्षा भाकरीचे दर अधिक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे सांधेदुखी, सर्दी व अन्य आजार डोके वर काढतात. त्यामुळे पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केला जातो.
जिल्ह्यातील विविध भागात यंदा बाजरीचे उत्पादन कमी झाल्यानेही दरात वाढ झाल्याची माहिती आहे. सद्य: स्थितीत बाजारात तुरळक आवक आहे. जिल्ह्यात यंदा मोजक्याच भागात बाजरीचे उत्पादन आहे. बहुतांश शेतकरी घरापुरते बाजरीचे उत्पादन घेतात. यामुळे मागणी तेवढा पुरवठा नसल्याची माहिती व्यापारी देत आहेत. येत्या काळात आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्यताही व्यापारीकडून सांगण्यात येत आहे.