22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल

आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल

ठाणे : भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादाने शनिवारी सर्वांत गंभीर रूप घेतले. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शेतक-यांनी दाखल केला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी १.०० वाजता जातिवाचक शिवीगाळ केली, असा आरोप शेतक-यांनी केला. त्यामुळे त्यांच्यासह जितेंद्र पारीक, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, नगेश वारघेट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नीता एकनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३१ जानेवारी रोजी गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर कंपाऊंड करण्याचे काम सुरू केले. आम्ही त्यांना जाब विचारला तेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी आम्हास मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला. त्यानंतर जातिवाचक शिवीगाळ केली. तुम्ही तुमच्या जमिनीकरता कोणत्याही कोर्टामध्ये जा, आम्ही ती घेऊ, असे ते म्हणाले.

गायकवाड यांना अकरा दिवसांची पोलिस कोठडी
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना शनिवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना अकरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR