24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात महिला अत्याचारांत वाढ; नाशकात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आक्रमक

राज्यात महिला अत्याचारांत वाढ; नाशकात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आक्रमक

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. विशेषत: पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत राजकीय पक्ष उघडपणे तक्रारी करीत आहेत.
महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महिला आघाडी शहरात आता चांगलीच आक्रमक झाली आहे. याबाबत महिला आघाडीच्या पदाधिका-यांनी पोलिसांना निवेदन दिले. तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलनाला तयार रहा, असा इशारा दिला आहे.

नाशिकसह राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्याबाबतची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. त्यातही पोलिस गुन्हे नोंदविण्यासाठी टाळाटाळ करतात. असे प्रकार वारंवार घडत असल्याने ही दुर्दैवी बाब आहे, असेही संतप्त महिला नेत्यांचे म्हणणे होते.

नाशिक शहर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत महिलांनी शहराच्या विविध भागात होणारे उपद्रव आणि महिला, विद्यार्थिनी यांच्याबाबत होणारे गुन्हे यांची सविस्तर माहिती दिली.

सध्या राज्यात दर तासाला महिला अत्याचाराच्या ५ घटना घडतात. गतवर्षीच्या गुन्ह्यांचा विचार करता राज्यात सात हजार ५२१ बलात्कार, नऊ हजार ६८९ अपहरण आणि १६९ हुंडाबळी तर नातलगांकडून होणा-या क्रूर त्रासाच्या ११ हजार २२६ घटना आहेत.
विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे १७ हजार २८१ गुन्हे नोंदविले आहेत. हे सर्व पोलिसांचा प्रभाव आणि वचक कमी झाल्याने होत आहे. नाशिक शहरात पोलिसांनी तातडीने पावले न उचलल्यास शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR