पुणे : प्रतिनिधी
तंत्रज्ञानातील वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांनी सज्ज करण्यासाठी राज्यातील सर्व तंत्रनिकेतनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) दिले आहेत. राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित तंत्रनिकेतनसह सर्व संस्थांमध्ये अध्यापन, अध्ययन, शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाजासाठी एआय आधारित साधनांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
मंडळाचे सचिव डॉ. मारुती गायकवाड यांनी यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. पारंपरिक अध्यापन पद्धतींसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक शिक्षण देण्यास मदत होणार आहे; तसेच शिक्षकांचा वेळखाऊ कामांवरील भार कमी होऊन संस्थांच्या प्रशासकीय कामकाजातही सुलभता येऊ शकते, असा उद्देश आहे. त्यानुसार तंत्रनिकेतनांनी शैक्षणिक कामकाजासाठी गुगल वर्कस्पेसचा वापर करण्याचा विचार करावा; तसेच संस्थात्मक डोमेनवर आधारित ई-मेल आयडींच्या माध्यमातून ‘जेमिनी’ आणि ‘गुगल एआय प्रो’ यांसारख्या सुविधांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एआयची अध्यापनासह विविध कामांत मदत
या साधनांमुळे शिक्षकांना अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्य तयार करणे, विषयांचे सुलभ स्पष्टीकरण देणे आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांनाही विषय समजून घेणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि अध्ययन अधिक प्रभावी बनविण्यासाठी एआयची मदत घेता येणार आहे.
















