पुणे : प्रतिनिधी
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. यावर्षी तर अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शिवाय शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी सुलतानी व अस्मानी, अशा दोन्ही संकटांमध्ये भरडला जात आहे. पूर्वीपासून शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनासह दूध उत्पादनाला प्राधान्य देत आहेत.
मागील १५ दिवसांपासून चारा, पशुखाद्य, सरकी, पशुखाद्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडल्याने शेतक-यांनी दूध व्यवसायाकडे पाठ फिरवलेली दिसत आहे. पशुखाद्य दरवाढ ही दूध दराच्या हिशेबाने कमी असून पशुखाद्य भाववाढीमुळे पशुपालन व दुग्ध व्यवसाय संकटात आला आहे. आज पशुपालकाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जनावरे चरायला नेणारे गुराखी मिळत नाहीत.
तसेच मजुरी वाढल्यामुळे शेतक-यांना परवडणारे नाही. अलीकडे पशुखाद्यात कधी नाही ती विक्रमी वाढ करण्यात आल्याने पशुपालक शेतक-यांची आर्थिक कोंडी होत आहे. पशुखाद्याच्या दरात हल्ली १०० ते २०० रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
शासनाने पशुखाद्याचे दर नियंत्रित करण्यावर भर देऊन पशुपालकांना पशुखाद्य परवडेल अशा दरात उपलब्ध करून द्यावे, दुधाला वाजवी भाव द्यावा, अशी मागणी पशुपालक शेतक-यांकडून केली जात आहे.