30.4 C
Latur
Friday, July 5, 2024
Homeमहाराष्ट्रनाशकात हेमंत गोडसे ‘हॅट्ट्रिक’साधणार?

नाशकात हेमंत गोडसे ‘हॅट्ट्रिक’साधणार?

मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक निकालापूर्वीच नवा इतिहास घडविला आहे. १९६७ नंतर नाशिकमध्ये प्रथमच ६०.७५ टक्के भरघोस मतदान झाले असून, २०१९च्या तुलनेत यंदा सव्वा टक्का अधिक मतदान झाले. एकंदरीत गेल्या ५७ वर्षांतील मतदानाचा उच्चांक मोडीत काढत वाढलेला मत टक्का कोणाला धक्का देणार, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. या निवडणुकीतून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे ‘हॅट्ट्रिक’ साधतात की, महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे अथवा शांतिगिरी महाराज यांना संधी मिळणार याकडे केवळ नाशिककरच नव्हे तर, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा कमालीची चुरशीची ठरली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटासाठी जशी ही निवडणूक अस्तित्वाची आहे, तितकीच ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे गटाच्या प्रतिष्ठेचीही आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघ शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजपचे अ‍ॅड. राहुल ढिकले आमदार असल्याने महायुतीचे उमेदवार गोडसे यांना या मतदारसंघातून अधिक पाठबळ मिळेल, हे उघड आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात ५५.३८ टक्के मतदान झाले आहे. यंदा या मतदारसंघातील मतदानाचा टक्का सरासरी गत पंचवार्षिकइतकाच राहिला आहे. २०१४ व २०१९ प्रमाणेच यंदाही या मतदारसंघातून गोडसेंना मतांची आघाडी मिळेल, अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे यंदा नाशिक पश्चिम विभागात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर व अन्य पदाधिका-यांनी गोडसे यांच्या मतांच्या आघाडीचा मार्ग रोखला. यंदा या मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले आहे.

नाशिक मध्य मतदारसंघात ५७.१५ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे आमदार असल्या तरी वारे वाजे यांच्या दिशेने वाहत होते हे या मतदारसंघात दिसून आले. विशेषत: जुने नाशिकसारख्या मुस्लिम बहुल भागात उत्स्फूर्तपणे झालेले मतदान गोडसे यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजविणारेच होते. इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे यांनी वाजे यांच्यासाठी चांगली मेहनत घेतली. इगतपुरीत ६६ टक्के मतदान झाले.

सिन्नर ठरवेल वाजेंच्या विजयाचे गणित
सिन्नर लोकसभा मतदारसंघात मराठा आणि वंजारी मतांचे प्राबल्य आहे. यंदा ६९.५० टक्के मतदान झाले असून, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा ४.५ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. यंदा राजाभाऊ वाजे यांना सिन्नरकरांची सर्वाधिक पसंती लाभेल, असे चित्र सुरुवातीपासूनच होते. अर्थात सिन्नरमधून वाजे जी मतांची आघाडी घेतील तीच त्यांच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे सध्या तरी चित्र आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR