30.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeसोलापूरवाढत्या स्त्रीभ्रूण हत्यांमुळे मुलींचा जन्मदर घटला

वाढत्या स्त्रीभ्रूण हत्यांमुळे मुलींचा जन्मदर घटला

सोलापूर : जिल्ह्यात २०२४ मध्ये ८४ बालविवाह रोखण्यात आले. बालविवाहाच्या प्रमाणात सोलापूर जिल्हा राज्यातील सर्वाधिक बालविवाह होणा-या जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये आहे. बालवयात विवाह केल्याने येथे माता, बालमृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये तब्बल एक हजार ३४४ बालकांचा (० ते ५ वर्षे) मृत्यू झाला आहे.

त्यात अक्कलकोटमध्ये १०६, बार्शीत १२७, करमाळ्यात ८२, माढ्यात १७१, माळशिरस व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येकी १०६, मोहोळ तालुक्यात १४९, पंढरपूर तालुक्यात १७४, सांगोल्यात १०२, उत्तर सोलापुरात ६९ आणि दक्षिण सोलापुरात १५३ बालमृत्यू झाले आहेत. मुलांच्या विवाहाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. त्यातूनच अनेकांची फसवणूक देखील होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, अनेक वर्षांपासून मुलींचा घटत असलेला जन्मदर हे आहे. सोलापूर शहरात एक हजार मुलांमागे ९३६ तर जिल्ह्यात हे प्रमाण ९३१ पर्यंत आहे. मंगळवेढा, माढा, उत्तर सोलापूर या तालुक्यात अजूनही एक हजार मुलांमागे ९२२ इतके मुलींचे प्रमाण आहे.

गरजू कुटुंबीयांनाही मुलगी ओझे वाटू नये, यासाठी केंद्राने सुकन्या योजना आणली. शेकडो कोटींचा निधी खर्च करून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबविले. राज्य सरकारने लेक लाडकी योजना आणली, उच्च शिक्षणही मोफत केले, अनेक प्रवर्गातील मुलींना शिष्यवृत्ती दिली. तरी, मुलींचे प्रमाण वाढले नसल्याचे आरोग्य विभागाकडील आकडेवारीतून दिसते. सोलापूर शहरात २०२१-२२ मध्ये मुलींचा जन्मदर ९५४ होता. त्यानंतर २०२२-२३ मध्ये ९५९ वर पोचलेला मुलींचा जन्मदर चालू वर्षात ९३६ पर्यंत खाली आला आहे. ग्रामीणमधील मुलींचा जन्मदर मात्र तीन वर्षांत ९३४च्या वर गेलेला नाही. कौटुंबिक हिंसाचार व हुंडाबळी, मुली-महिलांवरील अत्याचारात वाढ, बेरोजगारी, अशी कारणे त्यामागे असल्याचे सांगितले जाते.

काही महिन्यांपूर्वी साता-याहून एक फिरती व्हॅन अवैध गर्भपातासाठी माळशिरस तालुक्यात आली होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध पथकाने त्यांना पकडून पोलिस कारवाई केली होती. याशिवाय सोलापूर शहर हद्दीतील एका रुग्णालयावरही कारवाई झाली होती. छुप्या पद्धतीने कोणाच्यातरी ओळखीने सीमावर्ती भागात गर्भपात करणे, मेडिकलमध्ये सहजपणे उपलब्ध होणा-या गर्भपाताच्या गोळ्या घेऊन गर्भपात करण्याचेही प्रकार होत आहेत.

मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी मुलींच्या जन्माचे स्वागत असाही उपक्रम केला जातो. दोन मुली असलेल्या कुटुंबाला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून सहा हजार रुपये दिले जातात. महिला व बालविकास विभागाची माझी कन्या भाग्यश्री योजना देखील सुरु आहे. मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी प्रत्येक कुटुंबाला सरकारी योजनांची माहिती, मुलगी हिच वंशाचा दिवा असल्याचे महत्त्व पटवून देण्यावर भर देण्याचे नियोजन आहे असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR