सोलापूर : कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने लाखो चिमुकल्यांना मोबाइल व टिव्हीची सवय लागली आणि त्यातूनच दृष्टीदोषाची समस्या वाढल्याची वस्तुस्थिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून समोर आली. आता अंगणवाड्या ५० दिवसांपासून कुलूपबंद असल्याने चिमुकल्यांच्या हाती पुन्हा दिसू लागले आहेत.
कोरोना काळात तब्बल दीड वर्षे शाळा बंद राहिल्याने चिमुकली घरीच होती. या काळात लाखो चिमुकल्यांना मोबाइल व टिव्हीची सवय लागली आणि त्यातूनच दृष्टीदोषाची समस्या वाढल्याची वस्तुस्थिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून समोर आली. आता अंगणवाड्या ५० दिवसांपासून कुलूपबंद असल्याने पुन्हा चिमुकल्यांच्या हाती मोबाइल आल्याची वस्तुस्थिती आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी मानधन वाढ, नवीन मोबाइल, ग्रॅच्युइटी, पेन्शन, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा अशा मागण्यांसाठी ३ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन सुरू होऊन ५० दिवस झाले, तरीदेखील सरकार पातळीवरून त्यासंदर्भात तोडगा निघालेला नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्याची प्रमुख जबाबदारी सरकारी आहे, पण त्यात चिमुकल्यांचा काय दोष असा प्रमुख सवाल उपस्थित होत आहे.
कुपोषित बालकांचा आहार, गर्भवती महिला, स्तनदा माता यांना आहार पुरविण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरच आहे. मात्र, संपामुळे गर्भवती व स्तनदा मातांसह ६ महिने ते ३ वर्षांपर्यंतच्या बालकांना अजूनही जानेवारीतील आहार मिळालेला नाही. ५० दिवसांपासून अंगणवाड्या बंदमुळे चिमुकल्यांची सुटलेली मोबाइलची सवय पुन्हा वाढू लागली आहे. या नुकसानीला प्रमुख जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. कोरोनानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत २०२२ नंतर जिल्हा अंधत्व नियंत्रण विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील ० ते ६ व ६ ते १८ वयोगटातील मुलांची दृष्टीदोष तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २०२२-२३ मध्ये आठ हजार ८९ मुलांमध्ये दृष्टीदोष आढळून आला. तर २०२३-२४ मध्ये देखील अशीच स्थिती समोर आली आहे. राज्यस्तरावरून या मुलांना चष्मे वाटप करण्यात आले आहेत. पण, बालवयात दृष्टीदोष ही चिंतेची बाब होत असल्याचे मत नेत्रशल्यचिकित्सकांनी व्यक्त केले आहे.
मोबाइलचा अतिवापर, सतत टिव्ही पाहणे, मैदानी खेळाचा अभाव आणि पालकांना चष्मा असल्याने सध्या कमी वयोगटातील मुलांमध्येही दृष्टीदोष आढळत आहे. शाळा बंद असल्यास मुले घराबाहेर जावून मैदानी खेळ न खेळता घरात बसून मोबाइल, टिव्ही पाहतात. त्यामुळे १०० मुलांमागे सहा ते आठ मुलांमध्ये अशी समस्या आढळत आहे. त्यासाठी पालकांनी जागृत राहणे फार गरजेचे आहे.असे अंधत्व निवारण कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गणेश इंदुरकर यांनी सांगीतले.