नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतीगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी शांतीगिरी महाराज यांनी प्रयत्न केले. मात्र युतीकडून कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने महाविकास आघाडी आणि मनसेकडून उमेवारीची चाचपणी सुरू करण्यात जय बाबाजी भक्त परिवाराचा आग्रह सुरू होता.
राजकीय पक्ष उमेदवारी देतील अशी शक्यता कमी झाल्याचे स्पष्ट झाले आणि जय बाबाजी भक्त परिवार आणि स्वामी शांतीगिरी महाराज यांनी एकला चलो रे ची भूमिका घेत अपक्ष उमेदवारी करण्याचे जाहीर केले. स्वामी शांतीगिरी महाराज यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा भक्त परिवार आहे. ग्रामीण भागातील प्रचार सुरू झाल्यानंतर आता शहरी भागात स्वामी शांतीगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे आहे. येणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रत्येक पक्षाकडून नाशिक लोकसभेत आपलाच खासदार असावा अशी अपेक्षा ठेवून सोयीचे राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देत मोठी चाल खेळली गेली. तर आता महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नाराजीनंतर मंत्री छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
उमेदवारी घोषित करण्यासाठी वेळ लागत असल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र आता नाशिक लोकसभेच्या जागेचा वाद सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता अपक्ष उमेदवारी करत आघाडी आणि युतीच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार हा निवडणुकीच्या आखाड्यात जोमाने प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे.