38 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसंतोष चौधरींची बंडाची ‘तलवार’ अखेर म्यान

संतोष चौधरींची बंडाची ‘तलवार’ अखेर म्यान

शरद पवारांची शिष्टाई फळाला

रावेर : रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यावर नाराज झालेल्या माजी आमदार संतोष चौधरी यांनी बंडाची तलवार मोठ्या तीव्रतेने उपसली.. मात्र, पक्षाचे नेते शरद पवार यांनी रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्यात दौ-यावर येत चौधरींची नाराजी दूर केल्यावर त्यांची बंडाची तलवार अखेर म्यान झाली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काही महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना तयारी करण्यासंबंधी सूचित केले होते. मात्र, खडसेंनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली. पक्षाने त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी यांना गळ घातली. मात्र, अनेक महिन्यांपासून आपण मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात तयारी करीत असल्याने त्यांनीही लोकसभा लढण्यास नकार दिला.

अशातच खडसेंनी भाजपत प्रवेशाचा निर्णय घेतल्याने पवार गटाची चांगली गोची झाली. अशा वेळी ‘राष्ट्रवादी’ शरद पवार गटाकडे अन्य नावांच्या पर्यायावर विचारमंथन सुरू झाले. त्यात माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील व कंत्राटदार विनोद सोनवणे यांची नावे चर्चेत आली. दोन आठवड्यांपूर्वी तर संतोष चौधरींनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे सांगत त्यांच्या समर्थकांनी भुसावळला जल्लोषही केला.

मात्र, रावेरचे आमदार शिरीष चौधरींनी श्रीराम पाटलांचे नाव शरद पवारांना सुचविले आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यावरून संतोष चौधरी नाराज होते. चौधरींनी गेल्या आठवड्यात भुसावळला निर्धार मेळावा घेऊन अपक्ष अथवा अन्य तीन-चार पक्षांकडून आपल्याला निवडणूक लढण्याची ‘ऑफर’ असल्याचे सांगत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. त्यामुळे रावेर मतदारसंघात चौधरींच्या बंडखोरीची चर्चा सुरू झाली.

पवारांची शिष्टाई कामी
चौधरींनी तर शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर येतील व ऐनवेळी सभेतच आपली उमेदवारी घोषित करतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. परंतु, रविवारी जिल्ह्याच्या दौ-यावर असलेल्या पवारांनी त्यांच्या खास शैलीने पदाधिकारी, नेत्यांची समजूत काढली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR