29.2 C
Latur
Monday, February 10, 2025
Homeक्रीडाइंग्लंडला पराभूत करत भारताने घातली मालिका खिशात

इंग्लंडला पराभूत करत भारताने घातली मालिका खिशात

रोहित शर्माची विक्रमी खेळी

कटक : इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने २-० ने खिशात घातली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने सावध पण चांगली सुरुवात केली. पण ४९.५ षटकात सर्व गडी गमवत ३०४ धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडने विजयासाठी दिलेले ३०५ धावांचे आव्हान काही सोपे नव्हते. यासाठी आघाडीच्या एका फलंदाजाला शतक ठोकणं आवश्यक होते. रोहित शर्माचा फॉर्म पाहता काय होईल अशी धाकधूक लागली होती. पण रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सूर गवसला आहे. त्याने ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. मागच्या काही सामन्यांची उणीव त्याने भरून काढली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी सूर गवसल्याने क्रीडाप्रेमीही खूश आहेत. कारण रोहित शर्मामध्ये चांगली सुरुवात करून देण्याची ताकद आहे. आक्रमक फलंदाजीमुळे विरोधी संघाच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले जाते आणि विजय सोपा होतो. अगदी तसंच इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झाले. रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. भारताने ४४.३ षटकात ६ गडी गमवून हा सामना जिंकला.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल ५२ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. त्यानंतरही रोहित शर्माने आक्रमक अंदाज कायम ठेवला. रोहित शर्माने वनडे क्रिकेट कारकिर्दितले दुसरे वेगवान शतक ठोकले. यापूर्वी दिल्लीत २०२३ साली अफगाणिस्तानविरुद्ध ६३ चेंडूत शतक ठोकले होते. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध ७६ चेंडूत शतक ठोकले आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने मधल्या फळीत डाव सावरला आणि डाव पुढे नेला. पण अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्या धाव घेण्यावरून विसंवाद झाला. त्याचा फटका श्रेयस अय्यरला बसला आणि ४४ धावांवर बाद झाला.

विराट कोहली या सामन्यात काही खास करू शकला नाही. एकीकडे रोहित शर्माने आपल्या खेळीने टीकाकारांची तोंड बंद केली. दुसरीकडे, विराट कोहली मात्र एकेरी धावांवर बाद झाला. त्याने ८ चेंडूंचा सामना केला आणि एक चौकर मारत ५ धावा करून तंबूत परतला. आदिल राशीदच्या फिरकीत फसला आणि फिल सॉल्टकडे झेल देत बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद शमीही सुरुवातीच्या षटकात काही खास विकेट घेऊ शकला नाही. शेपटच्या एका फलंदाजाला बाद करण्यात यश आले. गस एटकिनसनला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. पण या सामन्यात सर्वात महागडा स्पेल टाकला. त्याने ७.५ षटकात १ विकेट घेत ६६ धावा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR