गोल्ड कोस्ट : येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी लोळवले. भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे आव्हान ठेवले असता धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १८.२ षटकांत सर्वबाद ११९ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर मॅथ्यू शॉर्टने २५ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने केवळ ३ धावांत ३ विकेट घेतल्या. तर शिवम दुबे व अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. अर्शदिप, बुमराह आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत भारताला सहज विजय मिळवून दिला. भारताकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या एडम झंपा व नॅथन एलिस यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या.
बुमराह शतकी विकेटपासून दूर
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने आता २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे आणि प्रत्येक वेळी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० बळी घेण्यापासून फक्त एक बळी दूर असून त्याने ७८ सामन्यांमध्ये ९९ बळी घेतले आहेत.

