23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियावर मात करत भारत उपांत्य फेरीत

ऑस्ट्रेलियावर मात करत भारत उपांत्य फेरीत

सेंट लुसिआ : टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या सुपर-८ फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना सोमवारी सेंट लुसिआ येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलमध्येही प्रवेश केला आहे. हा विजय टीम इंडियासाठी आणखी एका कारणामुळे खूप खास आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने विश्वविक्रमही केला आहे.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी कर्णधार रोहित शर्माच्या झुंझार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ५ विकेट गमावून २०५ धावा केल्या. तर रोहित शर्माने ४१ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार ठोकले. तर, सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. शिवम दुबेने २८ आणि हार्दिक पांड्याने नाबाद २७ धावा केल्या.

तर २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली, त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ २० षटकांत ७ विकेट गमावून केवळ १८१ धावाच करू शकला. अर्शदीप सिंग हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ३७ धावा देत ३ बळी घेतले. तर, कुलदीप यादवला २ बळी मिळाले. अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहला देखील १-१ विकेट मिळाली. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना २४ धावांनी जिंकला.

भारताने विश्वविक्रम केला नावावर
या विजयासह टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रमही केला आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत ५० सामने खेळले आहेत. या कालावधीत ३४ सामने जिंकले आहेत तर १५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने श्रीलंकेला मागे टाकले आहे. श्रीलंकेने टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ३३ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका ३१ विजयांसह तिस-या स्थानावर आहे.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
१. भारत – ३४ विजय
२. श्रीलंका – ३३ विजय
३. दक्षिण आफ्रिका – ३१ विजय
४. पाकिस्तान – ३० विजय
५. ऑस्ट्रेलिया – ३० विजय

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR