22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाबीडच्या ‘सचिन धस’ मुळे भारत नवव्यांदा अंतिम फेरीत

बीडच्या ‘सचिन धस’ मुळे भारत नवव्यांदा अंतिम फेरीत

मैदानाबाहेरून

पाच वेळच्या विश्वविजेत्या टीम इंडियाने नवव्यांदा आणि सलग पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक वन डे स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. गेली पंधरा दिवस झाले अंडर १९ विश्वचषक २०२४ दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू आहे. बेनोनी येथील मैदानावर झालेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा रोमांचक आणि अटीतटीच्या सामन्यात दोन गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आज पाकिस्तान -ऑस्ट्रेलिया यांच्यात विजयी होणा-या संघाबरोबर रविवारी अंतिम लढत होईल.
टीम इंडियाने या स्पर्धेत सलग पाच सामन्यांत विजय मिळवून उपान्त्य फेरी गाठली.

बांगलादेशला ८४ धावांनी, आयर्लंड व अमेरिकन संघालाही २०१ धावांनी पराभूत करत सुपर सिक्समध्ये प्रवेश केला. सुपर सिक्सच्या फेरीत न्यूझिलंडला २१४ तर नेपाळला १३२ धावांनी हरवत उपान्त्य फेरी गाठली. हे सर्व सामने प्रथम फलंदाजी करून जिंकले होते. या सर्व सामन्यांत मुशीर खानने महत्त्वाची भूमिका बजावली पण उपान्त्य सामन्यात मात्र यजमानांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. द. आफ्रिकेने भारताला २४५ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पार करताना बीडच्या सचिन धसने संकटमोचकाची भूमिका बजावली. सचिनने अर्धशतक ठोकत कॅप्टन उदय सहारनसह डाव सावरला.

प्रारंभी टीम इंडियाला २४५ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर झटका लागला. आदर्श सिंह बाद झाला. त्यानंतर मुशीर खान, अर्शीन कुलकर्णी आणि प्रियांशू मौल्या हे देखील झटपट बाद झाले. मुशीरने ४, अर्शीनने १२ आणि प्रियांशूने ५ धावा केल्या. टीम इंडियाची ११.२ षटकांत ४ बाद ३३ अशी नाजूक स्थिती होती. त्यानंतर उदय आणि सचिन या दोघांनी डाव सावरला. सचिनने ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९६ धावा काढल्या. मात्र, त्याचे शतक हुकले.
कर्णधार उदय सहारनने ८१ धावा केल्या. धस धावसंख्या २०३ असताना बाद झाला. कर्णधार उदय सहारनही धावबाद झाला. राज लिंबानीने येऊन चौकार ठोकला आणि टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली.

डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR