दुबई : इमर्जिंग आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत भारतीय संघाने आज सलग तिसरा सामना जिंकला. भारत ‘अ’ संघाने तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध व दुसरा सामना युएईविरूद्ध जिंकला. तर, ओमानविरूद्धच्या तिस-या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आणि स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ओमानला दुस-या षटकात अमिर कलीमच्या रूपाने (१३) पहिला धक्का मिळाला. त्यामागोमाग निशांत सिंधूच्या गोलंदाजीवर कर्णधार जतिंदर सिंग(१७) माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या करन सोनावलेला स्वस्तात परतावे लागले. पहिल्या ५ षटकांमध्ये ३३ अशी ओमानची परिस्थिती होती. त्यानंतर वसीम अली व मोहम्मद नदीम यांच्या जोडीने संथ खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
पण १५ व्या षटकात वसीम अलीला(२४) साई किशोरने माघारी पाठवले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद नदीमने हमद मिर्झाने ५४ धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात मोहम्मद नदीम ४१ धावांवर बाद झाला व ओमनचा डाव १४० धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात भारताकडून वापरण्यात आलेल्या ८ फलंदाजांपैकी ५ फलंदाजांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.
ओमानच्या १४० पाठलाग करण्यासाठी भारतीय सलामीजोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. एका बाजूने अनुज रावत स्थिरावण्यासाठी वेळ घेत होता. तर अभिषेक शर्माने आपल्या नेहमीच्या अंदाजात आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. अनुज रावतला चौथ्या षटकात ८ धावा करत माघारी परतावे लागले. तर, पाचव्या षटकात करन सोनावलेच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा (३५) झेलबाद झाला. पुढे कर्णधार तिलक वर्मा व आयुष बदोनीने ८५ धावांची भागीदारी केली. आयुषने २५ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले.
१४ व्या षटकात आयुष (५१) बाद झाला व पाठोपाठ नेहल वधेराही(१) परतला. त्यानंतर तिलक वर्मा व रमनदीप सिंगच्या जोडीने १६ व्या षटकात भारताला विजयी केले. तिलक वर्मा ३० चेंडूत ३६ धावा करत नाबाद राहीला. तर रमनदीप सिंगने ४ चेंडूत १३ धावा केल्या व भारताने सामना ६ विकेट्सने जिंकला. भारताने तीन साखळी सामन्यांपैकी तिन्ही सामने जिंकून ‘ब’ गटातून उपांत्य फेरी गाठली आहे.